धोडप किल्ला माहितीDhodap killyachi mahiti
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील हट्टी गावाजवळ धोडप किल्ला आहे. सह्याद्री पर्वताच्या अजिंठा सातमाळा या उप डोंगर रांगेत हा किल्ला येतो.
• उंची :
किल्याची सरासरी उंची १४५१ मीटर उंच हा किल्ला आहे. महाराष्ट्रातील किल्याच्या उंचीत दुसऱ्या स्थानावर आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई या आंतरराष्ट्रीय शहरातून नाशिक येथून धुळे रोडवर वादळीभोई गावाचा फाटा लागतो. तेथून धोडांबे येथून हट्टी गाव तेथून पायी आपण गडावर जाऊ शकतो.
• नाशिक – दिंडोरी - वणी – कळवण रोडने पुढे वणी कळवण लिंक रोडने ओतूर मार्गेही जाता येते.
• नाशिक – दिंडोरी – कसबा वणी – वणी – पारगाव – इंदिरानगर – हटी गाव येथून धोडप किल्ला पहायला जाता येते.
• हा किल्ला शिवलिंग आकाराचा आहे.
• धोडप किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• नाशिक येथून कळवण तालुक्यातील हट्टी गावात आल्यावर तेथून रानवाटेने धोडपकडे जाता येते.
• हनुमंत मंदिर :
पायी चालत जाताना आपल्याला हनुमंत देवतेचे खुले मंदिर लागते. शेंदरी रंगात रंगवलेली हनुमंत मूर्ती पहायला मिळते. वीर व बलोपासनेची देवता म्हणून हनुमंत प्रख्यात आहेत.
• पहिला दरवाजा :
हनुमंत दर्शन घेऊन पुढे चालत गेल्यावर आपल्याला गडाचा प्रमुख दरवाजा लागतो. अजूनही भक्कम स्थितीत असलेला नक्षीदार कमान व दरवाजा रचना पाहता तत्कालीन वैभवाचा अंदाज येतो.
• शिव व गणपती मंदिर :
वाटेत पुढे चढून जाताना आपल्याला छोटेखाणी असलेली दोन ते तीन मंदिरे लागतात. घुमटी आकाराच्या या मंदिरात शिवपिंड तर एकात गणेश मंदिर असलेले पहायला मिळते. गणेश ही विघ्न दूर करणारी देवता म्हणून तर शिव ही शांती व लढण्यास प्रेरणा देणारी देवता म्हणून पूजनीय आहे.
• चौकोनी पायरी विहीर :
तेथून पुढे गेल्यावर एका बाजूला पायऱ्या खोदून तयार केलेली एक विहीर पहायला मिळते. आजही तिचे पाणी वापरात घेतलेले पहायला मिळते. वरील बाजूस कमान असलेली विहीर तत्कालीन किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली असावी.
• कातळ पायरी मार्ग :
पुढे गड चढणी करताना आपल्याला पायरी मार्ग कात्याळात खोदून तयार केलेला पहायला मिळतो. काही ठिकाणी तुटल्यामुळे चढून जाण्यासाठी लोखंडी जिने बसवलेले पहायला मिळतात.
• दुसरे प्रवेशद्वार :
आपल्याला पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते. खडकात खोदून तयार केलेले द्वार प्रेक्षणीय आहे. आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या तयार केलेल्या आहेत. व पुढे खोदून तयार केलेल पायरी मार्ग पहायला मिळतो. या दरवाजा बाहेर फारशी भाषेत शिलालेख पहायला मिळतो. हिजरी १०४६ साली मोहरम या सणादिवशी हा शिलालेख स्थापला असून अलीवर्दी खान याने मुघलशाहीत धोडप व परिसरातील ऐकूण सर्व १४ किल्ले जिंकून घेतल्याची माहिती यावरून समजते.
• बुरुज व तटबंदी :
किल्ल्याचे बुरुज व तटबंदी बऱ्याच प्रमाणात काळाच्या ओघात नष्ट झाली असून आता त्याचे अवशेष पाहायला मिळतात.
• पाणी टाके :
गडावर जागोजागी पाण्याची टाकी खोदली गेली असून त्यातील दगड इतर बांधकाम करण्यासाठी वापरले गेले. व सखल भागात खोदलेली पाणी टाकी पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली होती.
• पडकावाडा :
गडावर आपल्याला पडकावाडा पाहायला मिळतो. बराचसा भाग ढासळला असून काही शिल्लक भाग पाहता तत्कालीन भव्यता त्याची जाणवते. आजही काही भाग सुस्थितीत आहे.
• उंच गड माथा शेंडी व तेथील गुहा व पाणी टाक्या :
वाडा पाहून कठीण कात्याळ चढचढून गेल्यावर आपल्याला गडाचा उंच भाग लागतो. त्यास शेंडी असे म्हणतात. या भागात खडक खोदून चौकोनी गुहा तयार केल्या आहेत. तसेच पाण्याची टाकी सुध्दा खोदलेली आहेत.
यामधील दोन गुहा विस्तृत आहेत. त्यामध्ये धोडंब देवीचे मंदिर तर दुसरे शिव मंदिर आहे. आतील बाजूस एक पाण्याचे टाके पाहायला मिळते.
• खाच :
गडावर विस्तृत पठारावर आपल्याला मध्ये खाच पहायला मिळते. या खाचेवरून धोडपची ओळख होते.
गड माथ्यावरून आपल्याला आजू बाजूला असलेला परिसर रावळ्या जावळ्या किल्ला , मार्कंडेय किल्ला पहायला मिळतो.
• धोडप किल्ल्याची ऐतिहासिक माहिती :
• बागलाण प्रांतातील बरेचशे किल्ले हे प्राचीन मध्य काळात होऊन गेलेल्या सातवाहन, यादव काळात बांधले गेले. यादव काळात विशेषत येथे लयन गुहा व पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या.
• पुढे यादवांकडून हे किल्ले सुलतानशाहीत गेले. व धोडप किल्ला देखील सुलतान शाहीत आला.
• सुलतानशाही नष्ट झाल्यावर धोडप किल्ला बहामनी सत्तेच्या ताब्यात गेला.
• बहामनी सत्ता विभाजीत झाल्यावर निजामशाहीत हा किल्ला आला.
• निजामशाही इ.स. १६३६ साली नष्ट झाल्यावर निजामशाही प्रदेश आदिलशाहीत व मुघल बादशहा यांनी वाटून घेतला. व बागलाणातील जिंकलेले किल्ले मुघल बादशाहाकडे गेले. धोडप ही त्यातील एक किल्ला होय.
• शहाजहान बादशहाच्या आदेशाने दक्षिणेतील किल्ले जिंकून घेण्यासाठी अलीवर्दिखान याने बागलाणातील सर्व किल्ले जिंकून मुघल सत्तेत आणले. त्यामध्ये इंद्राइ, धोडप, चांदवड, कोळदेहर, राजदेहर, कांचना मोचना, कण्हेर, जवळ्या, रावळ्या, मार्कंडेय, अचला, रामशेज, अहिवंतगड हे किल्ले घेतले.
• पुढे हा किल्ला मराठा सत्तेच्या ताब्यात आला.
दुसऱ्या सुरत लुटीनंतर छत्रपती शिवराय या किल्यावर आले होते.
• पेशवाई काळात माधवराव पेशव्यांविरोधात राघोबा दादा ऊर्फ रघुनाथराव पेशवा यांनी बंड केले. ते बंड सामोपचाराने मोडीत काढण्यासाठी माधवराव पेशवे व रघुनाथराव यांची भेट इथेच झाली होती.
• पुढे इसवी सन १८१८ साली पेशवाई संपुष्टात आली. व धोडप किल्ला इंग्रजी सत्तेच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी पुन्हा मराठ्यांनी बंड करू नये म्हणून या किल्ल्यावरील वास्तूंची तोडफोड केली.
• पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात हा किल्ला व प्रदेश आला.
राहण्याची सोय :
गडावर गुहा आहेत. तिथे राहण्याची सोय होऊ शकते. टाक्यातील पाणी वापरता येते.
जेवणाची सोय :
हट्टी गावात जेवणाची सोय होऊ शकते.
जाण्यासाठी उत्तम काळ :
धोडप गड भटकंतीसाठी जून ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
• अशी आहे धोडप किल्ल्याची ऐतिहासिक माहिती • Dhodap killyachi mahiti marathi madhe




















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.